पीडित तरुणीने घेतली एकनाथ शिंदे यांची भेट   

न्याय मिळवून देण्यासाठी सरकार कटिबध्द : शिंदे

पुणे : स्वारगेट अत्याचार प्रकरणातील पीडित तरुणीने सोमवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्‍हे यांची मुंबई येथे भेट घेतली. तरुणीला न्याय मिळवून देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही शिंदे यांनी दिली. 
 
स्वारगेट बसस्थानकात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार झाला होता. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटले होते. आता तरुणीने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्‍हे यांची भेट घेतली. शिंदे आणि गोर्‍हे यांनी तिच्या तब्येतीची विचारपूस केली. आरोपीला गाडेला कठोर शिक्षा करण्याची मागणी पीडितेने शिंदे यांच्याकडे केली. राज्य सरकार महिला सुरक्षा आणि न्यायासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याचे शिंदे यांनी यावेळी सांगितले. 
 
पीडितेला लवकरात लवकर न्याय मिळावा, यासाठी गोर्‍हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही चर्चा केली. स्वारगेट बसस्थानकातील अत्याचार प्रकरणात न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेकडे पाठविलेल्या नमुन्यांच्या आधारे आरोपी दत्ता गाडेच्या डीएनए चाचणीचा अहवाल पोलिसांना अद्याप प्राप्त झालेला नाही. डीएनए चाचणी अहवाल मिळताच, एका आठवड्यात आरोपपत्र दाखल केले जाईल, असे गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त शैलेश बलकवडे यांनी सांगितले.  स्वारगेट बसस्थानकाच्या आवारात २५ फेब्रुवारीला शिवशाही बसमध्ये एका २६ वर्षीच्या तरुणीवर अत्याचार झाला होता. या प्रकरणी स्वारगेट पोलिसात गुन्हा दाखल असून, आरोपी गाडेला अटक करण्यात आली. गाडेची रवानगी सध्या येरवडा कारागृहात करण्यात आली| पोलिसांनी या प्रकरणात सखोल तपास करून, सीसीटीव्ही फुटेज, ससून रुग्णालयाचा वैद्यकीय अहवाल आणि बसच्या न्यायवैद्यक तपासणीचा अहवाल मिळवला आहे. पंधरा दिवसांत आरोपपत्र दाखल करण्याचे उद्दिष्ट पोलिसांनी ठेवले होते. मात्र, डीएनए चाचणी अहवाल प्राप्त न झाल्याने आरोपपत्र दाखल करण्यास विलंब झाला आहे.  
 

Related Articles